सुनिता विल्यम्स आज पृथ्वीवर   

वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज (बुधवारी) पहाटे पृथ्वीवर पोहोचणार आहेत. मागील नऊ महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता आणि बुच विल्मर अंतराळात अडकले होते.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून मंगळवारी त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. दोन दिवसांपूर्वी, रविवारी सुनीता  आणि त्यांचे सहकारी बुच विल्मर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासा आणि स्पेसएक्सने प्रक्षेपित केलेल्या क्रू-१० मिशनचे सदस्य अंतराळ स्थानकावर दाखल झाले होते. सुनीता यांनी क्रू-१० च्या सदस्यांना आलिंगन देऊन त्यांचे स्वागत केले होते.
 
सुनीता आणि विल्मर यांना घेऊन येणारी स्पेस कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून जवळ समुद्रात उतरेल, असे नासाने म्हटले आहे. नासाचे अंंतराळवीर निक हेग आणि रशियाच्या रॉसकॉसमासचे अंंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हेदेखील असणार आहेत. दरम्यान, सुनीता यांच्या गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडिलोपार्जित झुलासन गावात जोरदार तयारी करण्यात आली आहे. सुनीता पृथ्वीवर सुखरुप पोहोचताच फटाके वाजवून स्वागत केले जाणार आहे. गावातील मंदिरात विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, सुनीता यांच्या छायाचित्राची मिरवणूक देखील काढली जाणार आहे. आम्ही ग्रामस्थ दिवाळी साजरी करणार असल्याचे सुनीता यांचे चुलत भाऊ नवीन पंड्या यांनी सांगितले. आम्ही सुनीता यांना गावात बोलाविणार आहोत, असेही ते म्हणाले.
 

Related Articles